।। गोड बोला, देश जोडा ।।

भारत हा सणावाराचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण असतोच. थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. विशेष म्हणजे इतर सणांची तारीख ही पंचांगानुसार बदलती असते मात्र संक्रांत ही दरवर्षी १४ जानेवारी या तारखेलाच येते. यावर्षी संक्रात १५ जानेवारी रोजी  आली आहे. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्वही आहे. या दिवसा आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात. थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याचीही पद्धत आहे. ​
मकर संक्रांती म्हणजे काय ?
मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. आता हा सण दरवर्षी एकाच तारखेला कसा येतो असा प्रश्नही आपल्यातील अनेकांना निश्चितच पडला असेल. तर हा हिंदु संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो त्याच तारखेला येतो. याचे कारण म्हणजे तो सूर्याच्या (सूर्याच्या स्थानावर) कॅलेंडरनुसार बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडरवर (चंद्राच्या स्थानावर) आधारलेले असतात. सोलर सायकल ही दर ८ वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण १५ जानेवारीला येतो. यावर्षीही संक्रात १५ जानेवारी रोजी आली आहे.
मकरसक्रांतीचे पौराणिक महत्त्व

मकरसंक्रांतीच्याच दिवशी गंगा नदीचे आगमन पृथ्वीवर झाले होते अशी आख्यायिका आहे. महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच आपल्या देहाचा स्वेच्छाने त्याग केला होता. दक्षिणायनमध्ये जर आपल्या देहाचा आपण त्याग केला तर आपल्याला गती मिळणार नाही अशी भीष्मांची आस्था होती. त्यामुळेच त्यांनी उत्तरायण हा काळ निवडला होता. उत्तरायणाचे सहा महिने हे शुभ असतात असे भगवद्-गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी देखील म्हटले आहे.
मकर संक्रातीची तारिख बदलत राहणार?

पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार ही तारिख पुढे सरकत जाणार आहे. याचे कारणही त्यांनी सांगितले. आर्यांचे पूर्वज उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते, तेथे सहा महिन्यांचा दिवस व सहा महिन्यांची रात्र असते. सूर्य २१ डिसेंबर रोजी सायन मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिनमान वाढत जाते . परंतु आपली पंचांगे ही निरयन असल्यामुळे सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत असते. मकर संक्रांत नेहमी १४ जानेवारीला येते असे नाही. सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबर रोजी आली होती. सन १८९९ पर्यंत मकर संक्रांती १३ जानेवारीला येत होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांती १४ जानेवारीला येत होती. १९७२ पासून सन २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल असेही पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
 या सणादिवशी भारतामध्ये स्थिती फारशी अनुकूल नाही कारण आपला देश CAA, NRC अश्या वेगवेगळ्या कारणांनी धुसमुसतोय याप्रसंगी एकच सांगू इच्छितो की "गोड बोला, देश जोडा".
                         संजय जाधव सर

Comments