परमपूज्य सानेगुरुजी यांना विनम्र अभिवादन :संजय जाधव सर


 🚩संस्कारभूषण सानेगुरुजी यांना 

          स्मृतीदिना निमित्त विनम्रअभिवादन 🚩


        सानेगुरुजी हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक 

   समाजवादी विचारवंत , सामाजिक कार्यकर्ते व मराठी साहित्यिक होते . साने गुरुजींचा जन्म  कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला .गुरुजींच्यावरआपल्या  आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव होता. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्यांची देवता होती .'आई माझा गुरु -आई माझी कल्पतरू 'असे तिचे वर्णन 'श्यामची आई 'या पुस्तकातून त्यांनी केले आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि बलसागर भारत होवो'या  त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत.

            दिनांक २४ डिसेंबर १८९९  या दिवशी त्यांची पाऊले जगाला प्रथम दिसली. वडील हे गावचे खोत होते. सदाशिव हे कागदोपत्री असणारे त्यांचे नाव .त्यांच्या आई यशोदा या नावाने परिसरात ओळखल्या जात असत. गुरुजींचे नाव पांडुरंग होते ,पण आई त्यांना पंढरी असे म्हणत.

     बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्यांची देवता होती.आपल्या आईच्या ठायी सानेगुरुजी यांना काय काय दिसावे? तिच्या अंगी फुलांची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता ,सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमाशीलता .प्रत्येक आई ही अशीच असते अशी गुरुजींची श्रद्धा होती .'आई' या दोन अक्षरात सर्व देवतांची दिव्यता सामावली आहे, असे गुरुजी म्हणत. साने गुरुजींची आई ही गाईगुरांना जीव लावणारी, झाडांमाडांना  जपणारी ,गडी माणसांना सांभाळणारी, संवेदनाक्षम, सह्रदय  आणि संस्कारक्षम अशी स्त्री होती .त्यांचे वडील हे करारी स्वभावाचे ,राष्ट्रनिष्ठ गृहस्थ  होते. 

          शिक्षणाविषयी सानेगुरुजींची एक निश्चित भूमिका होती .ते म्हणत, "शिक्षक हा मुले आणि पुस्तके यामधला  दलाल नसतो, तो पुस्तकातील ज्ञानाचा भार वाहणारा हमाल नसतो; मुलांना जीवनदृष्टी देणारा त्यांचा मार्गदर्शक व मित्र असतो"

        खरा शिक्षक  काय करतो या  संदर्भात गुरुजी लिहितात,"खरा  शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन, भविष्यकाळाच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो. आजपर्यंत जगाने काय केले याची कल्पना देऊन, उद्या मानवजातीला काय करायचे आहे याची सूचना देतो .अशा विशाल दृष्टीचे शिक्षक मुलांना मिळायला हवेत; परंतु लहान मुलांच्या दुर्दैवाने अत्यंत संकुचित वृत्तीचे, मनाने व बुद्धीने जड, जरठ झालेले प्रतिभाहीन,ध्वेयहीन, असेच शिक्षक मुलांना लाभत असतात.

        गुरुजी स्वतःही एक राष्ट्रीय शिक्षक होते .मात्र मातृदेवतेच्या  जागी त्यांनी राष्ट्रदेवतेची प्राणप्रतिष्ठा केली होती .देशाची बांधिलकी हे त्यांच्यापुरते सर्वोच्च मुल्य होते.या एकाचं स्वभावगुणामुळे गुरुजींचा काळ शाळेत  थोडा आणि बंदीशाळेत अधिक  गेला .१९३०–३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नासिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला.नासिक जिल्ह्यातील चांदवड येथे ब्रिटीश सरकारविरुद्घ परखड भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमविणे, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करणे इ. कार्यांत त्यांनी स्वतःला झोकून दिले.जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला.

                  तिरुचिरा-पल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी   

 युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.पुणे येथे १९४७ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ ही त्यांची ह्या लेखनामागची भूमिका होती तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत, हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने श्यामची आई (१९३५) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय होय.त्यात श्याम हा आपल्या आईच्या आठवणी सांगत आहे आणि त्या स्मृतींतून भारतीय संस्कृतीतल्या उदात्त पैलूंनी समृद्घ झालेले एका मनस्वी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व विलोभनीयपणे आकारत गेलेले आहे. आपल्या मुलांचे आयुष्य उन्नत करण्याची केवढी मोठी अंतःशक्ती आईमध्ये असू शकते, ह्याचा प्रत्यय ह्या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे निदर्शनास येतो

                समाजातील जातिभेद ,अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी  महाराष्ट्राचा दौरा केला व या मुद्द्यावर यश मिळवून पांडुरंगाला त्यांनी खऱ्या अर्थाने मुक्त केले.

       दिनांक ११ जून १९५०  हा  निर्वाण दिन म्हणून त्यांनी निवडला. नवे कपडे परिधान केले. सेवादल आणि साधना परिवारातील व्यक्तींना त्यांनी पत्र लिहिले .आणि झोपेच्या बऱ्याच गोळ्या घेतल्या .अंथरुणावर  पाठ टेकली ही  त्यांची शेवटची काळझोप ठरली .आपल्या शेवटच्या एका  पत्रात त्यांनी लिहून ठेवले , "लोकशाही ,सत्याग्रही समाज हे ध्वेय धरा .ते तारील .अजातीय व अहिंसक लोकशाही व सत्याग्रही दृष्टी घ्या. भारतात रक्तपात न होता समाजवाद येवो. व्यक्तिस्वातंत्र्यासह समाजवाद फुलो.पूज्य  विनोबांचे स्मरण. "

            🙏अशा या संस्कारभूषण  साने गुरूजींना विनम्र अभिवादन🙏

                 संकलन:

                       श्री.संजय जाधव

Comments