*शिक्षक दिन*
सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जेव्हा स्टॅलिनला सम्राट अशोकच्या हृदयपरिवर्तनाची गोष्ट सांगितली..*
5 सप्टेंबर हा संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या शिक्षकांप्रती असलेल्या आदराचे आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती आणि तत्त्वचिंतक डॉ. श्री. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिन आहे.
राधाकृष्णन यांनी देशाचे राजदूत, उप-राष्ट्रपती, राष्ट्रपती अशी पदं भूषवली. पण ते नेहमीच एका शिक्षकाच्याच भूमिकेत राहिले. शिक्षण घेत असताना ते अध्यापकप्रिय विद्यार्थी होते आणि पुढे शिक्षक झाल्यावर ते विद्यार्थीप्रिय अध्यापक बनले.
भारतीय तत्त्वज्ञानाची त्यांनी नव्याने केलेली मांडणी, भारतीय तत्त्वज्ञानाचे त्यांनी केलेली चिंतन अजूनही एकमेवाद्वितीयच म्हणून गणले जाते. स्वातंत्र्योत्तर काळातील देशातील सर्वांत प्रभावशाली तत्त्वचिंतक आणि अभ्यासकांमध्ये त्यांची गणना होते.
त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. त्यांच्या जन्माप्रित्यर्थ हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म चेन्नईपासून 40 किमी अंतरावर असलेल्या तिरुतन्नी या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वीर सामैय्या होते, सामैय्या हे तहसीलदार होते.
प्रेसिडेन्ट्स ऑफ इंडिया, 1950-2003 या पुस्तकाचे लेखक जनक राज जय लिहितात की राधाकृष्णन यांचे वडील पारंपरिक हिंदू धर्मानुसार वागणारे होते. त्यांच्या कुटुंबाचे मूळ गाव सर्वपल्ली हे होते. राधाकृष्णन यांच्या आजोबांनी आपले गाव सोडले आणि तिरुतन्नी या ठिकाणी ते राहायला आले.
राधाकृष्णन यांनी आपल्या नावात गावाच्या नावाचा समावेश केलेला आहे.
आठ वर्षाचे असताना राधाकृष्णन यांचे नाव ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये घालण्यात आले. त्यानंतर लुथेरियन मिशनरी हायस्कूल, वूर्चस् कॉलेज वेल्लूर आणि मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
सोळाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. तर विसाव्या वर्षीच म्हणजेच 1908 साली इथिक्स ऑफ वेदान्त अॅंड मेटाफिजिक्स प्रसपोजिशन या विषयावर थिसिस लिहिला.
एमएमध्ये असताना त्यांना हॉग्स हे प्राध्यापक होते. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाची कठोर समीक्षा केली होती. या गोष्टीचा राधाकृष्णन यांना धक्का बसला. आणि त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा मुळापासून अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि प्रबंधासाठी त्यांनी वेदान्त हा विषय घेतला.
त्यावेळी या विषयावर इंग्रजीत पुस्तकं उपलब्ध नव्हती किंवा त्यावरील विश्लेषण उपलब्ध नव्हते पण तरीदेखील हा विषय त्यांनी घेतला. हॉग्स यांनी देखील या विषयाला मान्यता दिली आणि प्रबंधासाठी सहाय्य करण्याचे देखील म्हटले.
एम. ए. पूर्ण झाल्यावरच ते मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. ते आंध्र प्रदेश विद्यापीठ, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू बनले. ब्रिटिश अॅकेडमीचे फेलो म्हणून निवडले गेलेले ते पहिले भारतीय व्यक्ती ठरले आणि 1948 ला ते युनिस्कोचे प्रमुख बनले.
जेव्हा स्टॅलिन यांना सम्राट अशोकाच्या हृदयपरिवर्तनाची गोष्ट सांगितली
जेव्हा राधाकृष्णन हे मॉस्कोत भारताचे राजदूत होते तेव्हा अनेक दिवस रशियाचे राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन यांनी त्यांना भेटीची वेळच दिली नाही.
सहा महिन्यानंतर त्यांना भेटीची वेळ देण्यात आली. राधाकृष्णन जेव्हा स्टॅलिन यांना भेटले तेव्हा
ते त्यांना म्हणाले, तुमची भेट घेणं इतकं का अवघड आहे. त्यावर स्टॅलिन म्हणाले की तसं असतं तर तुम्ही आता देखील भेटायला येऊ शकला नसता.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल देशातील अनेक मोठ्या लेखकांनी लिहिले आहे. हिंदीचे प्रसिद्ध कवी रामधारी सिंह दिनकरांनी त्यांच्याबद्दलचा एक किस्सा लिहिला आहे. स्टॅलिन आणि राधाकृष्णन यांची भेट झाली तेव्हा त्यांनी स्टॅलिन यांना त्यांनी सम्राट अशोकची गोष्ट सांगितली होती.
राधाकृष्णन म्हणाले होते की, आमच्या देशात एक राजा होता. तो क्रूर आणि निर्दयी होता. त्याने रक्तरंजित मार्गावर चालून आपली प्रगती साधली आणि साम्राज्याचा विस्तार केला. पण एका युद्धानंतर त्याच्या मनात ज्ञान जागृत झाले. तेव्हापासून धर्म, शांती आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारला. तुम्ही देखील हा मार्ग का स्वीकारत नाहीत?
डॉक्टर राधाकृष्णन यांच्या या प्रश्नाचं स्टॅलिन यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. पण जेव्हा राधाकृष्णन तिथून निघून गेले तेव्हा स्टॅलिन आपल्या दुभाष्याला म्हणाले, 'या माणसाला राजकारण कळत नाही, ते केवळ मानवतेचे दूत आहेत.'
त्यांची आणि स्टॅलिनची अजून एक भेट प्रसिद्ध आहे. हा प्रसंग तत्त्वचिंतक नरहर कुरुंदकर यांनी आपल्या 'अन्वय' या पुस्तकात लिहिला आहे. ते लिहितात, स्टॅलिन आजारी होता. म्हणून तो अंथरुणावर निजलेला होता. राधाकृष्णन शेजारच्या कोचावर बसले होते. थोडीफार चर्चा झाल्यावर ते म्हणाले, आज तुमची प्रकृती बरी नाही. मी नंतर भेटेन आणि ते स्टॅलिनच्या जवळ गेले.
त्यांच्या चेहऱ्यावरुन हात फिरवत म्हणाले, 'भल्या माणसा, थोडा विसावा घे. शरीराचे आजार हे असणारच, ते धैर्याने भोगावे. मनाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.' स्टॅलिन म्हणाला 'त्यांचा हात किती वात्सल्य आणि मायेने भरलेला आहे!'कुरुंदकर यांचं निरीक्षण असं होतं की, सर्वपल्ली राधाकृष्णन हे राजशिष्टाचाराचे संकेत पाळायचे नाहीत, कारण संकेत हे राजदूताला असू शकतात. तत्वज्ञाला नाहीत. कुरुंदकर लिहितात, आता हा ही संकेतभंग (राष्ट्राध्यक्षला हात लावणे) पण आजारी माणसाला तत्त्वज्ञ काय सांगणार? राधाकृष्णनांच्या वत्सलतेला राष्ट्रसीमेची बंधने थोडीच होती.
माओ यांचे गाल थोपटले
सर्वपल्ली राधाकृष्णन चीनला गेले तेव्हा चीनचे नेते माओ यांनी आपल्या निवासस्थानी त्यांचा पाहुणचार केला. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तेव्हा राधाकृष्णन यांनी माओ यांच्या गाल प्रेमाने थोपटले होते.
त्यांच्या या कृतीचं माओंना आश्चर्य वाटलं यावर माओ काही बोलायच्या आधीच राधाकृष्णन यांनी म्हटलं, "अध्यक्ष महोदय. तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका. असंच मी स्टॅलिन आणि पोप यांच्याबरोबरसुद्धा केलं आहे."
भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यादरम्यान चीनमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांना त्या भेटीबद्दल सांगितलं.
"जेवण करताना माओ यांनी चॉपस्टिकच्या साहाय्यानं प्लेटमधील एक पदार्थ राधाकृष्णन यांच्या ताटात ठेवला. पण, राधाकृष्णन हे शाकाहारी आहे, याचा माओ यांना काही एक अंदाज नव्हता. राधाकृष्णन यांनीही माओ यांनी काही चूक केली, असं जाणवू दिलं नाही."
त्यावेळी राधाकृष्णन यांच्या बोटाला जखम झालेली होती. चीनच्या दौऱ्यापूर्वी कंबोडियाला गेले असताना कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे त्यांचा हात कारच्या दरवाजामध्ये अडकला होता आणि बोटाचं हाड मोडलं होतं. माओ यांनी हे बघितल्यानंतर डॉक्टरांना बोलावलं आणि राधाकृष्णन यांच्या बोटाची मलमपट्टी करून दिली.
आणखी एका हुकूमशहाचे कान टोचले
कुरुंदकर यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आणखी एक किस्सा सांगितला आहे ज्यात त्यांनी हुकूमशहाला त्यांच्याच देशात सुनावले. कुरुंदकर लिहितात, "सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती असताना झेकोस्लाव्हाकियाला गेले. तेथील संसदेसमोर त्यांचे व्याख्यान होते. व्याख्यानात ते म्हणाले, 'जगभर शांतता नांदावी आणि मानवजातीचा उत्कर्ष व्हावा यावर तुमच्या आणि माझ्या राष्ट्राचे व जनतेचे एकमत आहे. पण प्रत्येक राष्ट्राचे काही निराळेपण असते. संसदेचे काम शासनाच्या सर्व कृतींवर शिक्कामोर्तब करणे एवढेच आहे, असं आम्ही मानत नाही."
कुरुंदकर पुढे लिहितात, "हा पुन्हा हुकूमशाहीला फटकाच होता. पाहुण्या राष्ट्रपतीने यजमानाचा असा अपमान करायचा नसतो. पण तो राधाकृष्णन यांनी निर्भयपणे केला. प्रसिद्ध पत्रकार लुई फिशर या व्याख्यानाला हजर होते.
"त्यांनी म्हटले, त्यांचा आवाज स्पष्टपणाने आणि गंभीरपणाने निनादत होता. मात्र विजेच्या प्रचंड कडकडाटाने सर्वांनी सुन्न व्हावे तसा त्यांचा आवाज होता. क्षणभर मला वाटले, आपण टाळ्या वाजवून स्वागत करावे. पण पुन्हा वाटले ते बरे दिसणार नाही. झेकोस्लाव्हाकियाने वृत्तांत देताना ही वाक्ये गाळली. पण ते राष्ट्र शांत बसले. त्यांनी निषेध केला नाही."
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तत्त्वज्ञान
सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 25 ग्रंथ लिहिले आहेत. त्यात भारतीय तत्त्वज्ञानाचे दोन खंड, धर्म आणि समाज, द हिंदू वे ऑफ लाइफ, द प्रिन्सिपल्स ऑफ उपनिषद हे ग्रंथ सामील आहेत. गौतम बुद्ध, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकणारे ग्रंथ देखील त्यांनी लिहिले आहेत. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या तत्त्वज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. ग. ना. जोशी यांनी 'आधुनिक भारतीय तत्त्वचिंतक' या आपल्या ग्रंथात सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तत्त्वज्ञान कसे होते याबाबत आपले मत नोंदवले आहे. ते लिहितात, राधाकृष्णन हे भारतात घडलेल्या प्रबोधनाचे एक अत्यंत प्रभावी पुरस्कर्ते व उद्गाते आहेत. त्यांनी आपल्या विचारांत, भाषणात व ग्रंथात पश्चिमेकडील व पूर्वेकडील आणि भारतीय परंपरेतील उत्तमोत्तम विचार व संकल्पना यांची चाणाक्षपणे निवड करून त्यांच्यात विरोध व विसंवाद न होऊ देता त्यांचा समन्वय करून व्यापक सुसंवाद सुमेळ व सामंजस्य घडवून आणले आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व हे मानवतेलाच होते. माणुसकी जपून एक संपूर्ण मानव तयार व्हावा यासाठीच शिक्षण आणि इतर साधनांचा वापर व्हावा असे ते म्हणत.
माणसातील माणुसकी सातत्याने वृद्धिंगत व विकसित होत राहिली पाहिजे व मानव हा विज्ञान व त्याच्या भौतिक उपलब्धी यांचा दास न बनता स्वामी म्हणूनच राहिला पाहिजे.
नाहीतर माणुसकीचे सर्वोच्च व अतिसुंदर मुल्य आपण घालवून बसण्याचा बाका प्रसंग मानवजातीवर गुदरेल, असे सर्वपल्ली राधाकृष्णन यांना वाटत असे.
शिक्षक दिन का साजरा केला जातो?
भारतात 1962 पासून शिक्षक दिन साजरा केला जातो. याच वर्षी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताच्या राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारला होता. त्याआधी ते 1952 ते 1962 या काळात ते भारताचे उप-राष्ट्रपती होते.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मित्रांनी त्यांना विनंती केली की त्यांचा जन्मदिन साजरा करण्याची परवानगी देण्यात यावी. राधाकृष्णन म्हणाले की देशाचे भविष्य हे लहान मुलांच्या हातात आहे आणि त्यांना एक चांगला व्यक्ती बनवण्यात शिक्षकांचे मोठे योगदान आहे.
आपला जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला तर मला आनंदच होईल असे ते म्हणाले आणि तेव्हापासून शिक्षक दिन साजरा होऊ लागला.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट
1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी या गावी झाला.
2. तिरुत्तानी गावात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. 1093 मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठात पुढचं शिक्षण पूर्ण केलं. कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी असा त्यांचा नावलौकिक होता.
3. वाचनाची त्यांना प्रचंड आवड होती. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.
4. त्यांचा वेदांचा विशेष अभ्यास होता. तत्त्वज्ञान या विषयात त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.
5. 1909 मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांनी पाच वर्ष अध्यापनाचं काम केलं. म्हैसूर इथं तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं.
6. 35व्या वर्षी जॉर्ज पंचम यांच्या 'चेअर ऑफ फिलॉसॉफी' या पदी विराजमान होण्याचा मान मिळवला.
7. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना 'नाईटहूड'ने सन्मानित केलं. ही बिरुदावली पटकावणारे सर्वपल्ली हे पहिले आशियाई व्यक्ती होते.
8. राधाकृष्णन यांनी आंध्र तसंच बनारस हिंदू विद्यापीठाचं कुलगुरूपद भूषवलं.
9. 1931 ते 1939 या आठ वर्षांच्या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताचं प्रतिनिधित्व केलं.
10. 1949 ते 1952 या कालावधीत ते रशियात भारताचे राजदूत होते.
11. रशियाहून परतल्यानंतर राधाकृष्णन यांनी 1952 ते 19662 या कालावधीत उपराष्ट्रपतीपद भूषवलं. 14 मे 1962 रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले.
12. 1954 मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च अशा 'भारतरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
13. राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी 16 वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी 11 वेळा मानांकन मिळालं होतं.
14. माझा जन्मदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात यावा असे विचार सर्वपल्ली यांनी राष्ट्रपती असताना मांडले होते. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
15. 17 मे 1975 रोजी त्यांचं निधन झालं.

Comments
Post a Comment