राफेल नदाल रिटायर होतोय… टेनिस कोर्टवर त्याच्याविरुद्ध त्वेषाने खेळणारा पण कोर्टबाहेरच्या आयुष्यात त्याचा जीवलग मित्र रॅाजर फेडररने त्या निमित्ताने राफाला लिहिलेलं एक पत्र काल सोशल मीडियावर पोस्ट केलं. ते वाचताच त्याचा अनुवाद करणं भागच आहे असं वाटलं. रात्री केला. आत्ता एक हात फिरवून आता पोस्ट करतीये!
——
प्रिय राफा…
तू टेनिसमधून रिटायर व्हायच्या तयारीत आहेस तर मी फार भावनाविवश होऊन मला शब्द सुचणं बंद व्हायच्या आत मला मनातल्या काही गोष्टी तुझ्याशी शेअर करायच्या आहेत.
अगदी सुरुवातीपासून सुरुवात करुया. म्हणजे कुठून?! तू टेनिस कोर्टवर मला झोडपून काढायचास तिथून… मला ते तितकंसं जमलं नाही पण तू मात्र ते सहज जमवलंस. कोर्टवर माझ्या नाकीनऊ आणणं तुझ्या इतकं खरं तर इतर कुणालाच जमलं नाही. तुझ्या विरुद्ध खेळायला क्ले कोर्टवर येताना वाटायचं की मी तुझ्या बॅकयार्डमध्येच येतोय. तिथे हातपाय रोवून माझं स्थान टिकवायला मला एवढी मेहनत करावी लागेल असं स्वप्नातही वाटायचं नाही पण तू ती मला करायला लावायचास. तुझ्यामुळे मी माझ्याच खेळाचा पुन्हा विचार करायला लागलो. माझा खेळ मी ‘रिइमॅजिन’ करायला लागलो. अगदी माझ्या रॅकेट हेडचा साईज बदलण्यापर्यंत गेलो. त्याचा तरी माझ्या खेळावर काही परिणाम होईल अशी भाबडी अपेक्षा असायची माझी. मी तसा अजिबात अंधश्रद्धाळू नाही. पण तू मला अक्षरशः झपाटून टाकायचास. तुझी संपूर्ण प्रोसेस. तुझ्या त्या सगळ्या लहानसहान पण नेमस्त कृती. लुटुपुटुच्या लढाईला निघालेल्या शिस्तबद्ध सैनिकांसारख्या हारीने मांडलेल्या तुझ्या त्या पाण्याच्या बाटल्या… तुझं ते केस नीट करणं… कपडे ठीकठाक करणं… तुझं सगळंच! मला हे सगळंच सुप्तपणे आवडत होतं. कारण ते सगळंच तुझ्या व्यक्तीमत्वासारखं होतं, अत्यंत युनिक! तुझ्यामुळेच मी हा गेम जास्त एंजॅाय करायला लागलो!
अर्थातच सुरुवातीचा काळ याला अपवाद होता. 2004 च्या ॲास्ट्रेलियन ओपन नंतर पहिल्यांदा मला नंबर वन रॅंकिंग मिळालं. मला अक्षरशः आभाळ दोन बोटं उरलं. मला वाटत होतं आपण जगज्जेते झालो. मी त्याच थाटात वावरत होतो. पण नंतर दोनच महिन्यांनी मियामीत लाल स्लीव्हलेस शर्ट घालून, तुझे बायसेप्स दाखवत तू कोर्टवर अवतरलास आणि सहज मला हरवलंस… तोपर्यंत मालोर्काहून आलेल्या एका अमेझिंग यंग टॅलेंटेड टेनिसपटूबद्दलची ‘हाईप’ मी नुसतीच ऐकत होतो. तो भल्या भल्यांची छुट्टी करेल अशी तेव्हा चर्चा होती. ती चर्चा म्हणजे नुसतीच तुझी ‘हाईप’ नव्हती. त्यात तथ्य होतं. आपल्या दोघांच्याही प्रवासाची ती सुरुवात होती. मला हे तुला सांगायलाच हवं राफा, की या वीस वर्षांत काय जबरदस्त मजल मारलीस तू… 14 फ्रेंच ओपन्स! हे निव्वळ ऐतिहासिक आहे आणि म्हणतात ना, तेथे पाहिजे जातीचे! स्पेनला आणि अवघ्या टेनिस जगताला तुझा प्रचंड अभिमान वाटतो!
आपण एकत्र घालवलेल्या क्षणांच्या आठवणी सतत माझ्या मनात रुंजी घालतात. एकत्र खेळ प्रमोट करणं. साऊथ आफ्रिकेतल्या केप टाऊनमध्ये 50,000 लोकांसमोर अर्ध्या ग्रास कोर्ट आणि अर्ध्या क्ले कोर्टवर खेळणं. खेळताना एकमेकांवर जीव खाऊन तुटून पडणं आणि नंतरच्या ट्रॅाफी सेरेमनीजमध्ये एकमेकांना अक्षरशः धरुन ठेवणं…
2016 मध्ये तू मला राफा नदाल ॲकॅडमीच्या कार्यक्रमासाठी मोलार्काला बोलवलंस यासाठी मी अत्यंत कृतज्ञ आहे. खरं तर ते मीच मला निमंत्रित करुन घेतल्यासारखं होतं. मी तिथे यावं असं तुला वाटत होतं, तू मागे लागला नसतास पण अगदी खरं खरं सांगायचं तर मलाच तो कार्यक्रम मिस करायचा नव्हता. जगभरातल्या मुलांना तू रोलमॅाडेल वाटतोस. आमची मुलंही तुझ्या ॲकॅडमीत टेनिस शिकतात याचा मला आणि मिरकाला खूप आनंद वाटतो. हां, पण माझी मुलं डावखुरी टेनिसपटू होतील की काय याची काळजीही मला वाटते बरं का…
कट टू लंडन - 2022 चा लेव्हर कप! माझी शेवटची मॅच. त्या मॅचमध्ये तू माझ्याबरोबर कोर्टवर होतास, प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे तर माझा डबल्स पार्टनर म्हणून - माझ्यासाठी तेव्हा तुझं तिथे असणं काय आणि किती मोलाचं होतं हे मी तुला कसं सांगू?! त्या रात्री तुझ्याबरोबर ती मॅच खेळणं आणि नंतर एकमेकांच्या बरोबरीने डोळ्यातल्या पाण्याला वाट मोकळी करुन देणं… माझ्या करिअरमधली ती सर्वात खास आठवण असेल नेहमीच!
मला माहितीये तुझं लक्ष आता तुझ्या अद्वितीय
करिअरच्या अखेरच्या टप्प्याकडे आहे… त्यानंतर आपण पुन्हा बोलूच. पण आत्ता मला तुझ्या करिअरमध्ये तुझ्याबरोबर उभं राहिलेल्या, तुला साथ देणाऱ्या तुझ्या कुटुंबियांचं आणि टीमचं मनापासून अभिनंदन करायचंय…
आणि हो… तुझा हा जुना मित्र यापुढेही तू जे काही करशील त्यात सदैव तुझ्यासाठीच ‘चिअर’ करत असेल याची तुला आठवण करुन द्यायचीये!
तुझाच,
रॅाजर!


Comments
Post a Comment